रत्नागिरी:- जुलैमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातपिकांच्या नुकसानीपोटी शेतकर्यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नागरिकांच्या मालमत्तेसाठी मदत म्हणून निधी मंजूर करुन त्याचे वितरणही झाले. तथापि अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यात आली नव्हती. त्यानुसार राज्य आपत्ती निधीमधून नुकसानीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याला १ कोटी ८३ लाख रुपये आणि सिंधुदुर्गला १ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद आहे. अतिवृष्टीमध्ये साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक भातशेतीचा समावेश आहे. पुरामुळे भातशेती वाहून जाण्यापेक्षाही दरडी कोसळून किंवा नदीतील गाळ शेतीमध्ये साचून राहिल्याने ती नापिक होण्याचे प्रकार पुढे आले आहेत. चिपळूण,खेड तालुक्यातील सुमारे साडेसातशे हेक्टरवरील भातशेतीचे या पध्दतीने नुकसान झाले आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वितरण तत्काळ केले जाणार आहे.