रत्नागिरी:- शून्य पटामुळे समायोजित किंवा बंद झालेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपर्यंत करा, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु शिक्षण उपसंचालकांनी आजच काढलेल्या पत्रामुळे समायोजन प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. २०२४-१५ ऐवजी २०२५-२६ च्या जाहीर होणाऱ्या संचमान्यतेनुसार पुढील कार्यवाही करा अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे समायोजनानंतर अतिरिक्त ठरण्याची भिती असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९०० हून अधिक पदवीधर शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार शाळानिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आणि समायोजित झालेल्या तसेच शून्य पटामुळे बंद झालेल्या शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशनाने करण्याचे आदेश जिल्हापरीषद शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया तालुकास्तरावर सूरू झाली. त्यासाठी ५ डिसेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला. त्यानुसार समायोजन प्रक्रिया सुरू झाली. परंतु २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यतेची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्यात आली असल्याने अल्पावधीतच पुन्हा समायोजन प्रक्रीया राबवावी लागणार आहे. हे लक्षात आल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातील संचमान्यता जाहिर झाली की त्वरीत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करा आणि सध्या सुरू असलेली प्रक्रिया स्थगित करा अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हापरीषदेत सुरू असलेली कार्यवाही थांबविण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. सध्या जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक झालेली आहे. त्यामुळे नऊशेहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
शिक्षकांची ही आहे मागणी
जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या उपशिक्षकांची 926 पदे रिक्त आहेत. गणित व विज्ञानाच्या शिक्षकांची 570 पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची 27 पदे रिक्त आहेत. एकूण 1 हजार 523 पदे रिक्त आहेत. सर्व ठिकाणी समायोजनात संधी उपलब्ध करून दिल्यास एकाही शिक्षकाला शिक्षकांला जिल्ह्याच्या बाहेर जावे लागणार नाही. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पुढील समायोजनापूर्वी राबवला गेल्यास जिल्ह्यातील अनेक जागा रिक्त होतील. या रिक्त जागी शिक्षकांचे समायोजन करता येईल.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन सध्या स्थगित केले गेले आहे. परंतु राज्यभरात स्थिती रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच आहे. रिक्त पदांची संख्या कमी आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून संघटनांबरोबर चर्चा करून भविष्यातील निर्णय घेतले पाहिजेत. –दिलीप देवळेकर, शिक्षक नेते









