अणुस्कुरा घाटात गॅस टँकर पलटी; टँकर चालक ठार

राजापूर:- अणुस्कुरा – मलकापूर घाटात गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

अणुस्कुरा – मलकापूर घाटातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गॅस टँकर पलटी झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री अणुस्कुरा घाटमार्गे टँकर (एनएल- ०१-एन ६९७०) हा मलकापूरकडे जात होता. यावेळी चौथा मैल घाटाच्या खालच्या उताराच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या पलीकडे जाऊन इंडेन गॅस टँकर पलटी झाला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. तर वाहनाचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात चालक केबिनच्या बाहेर फेकला गेला होता. त्याच्या छातीला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. मृतदेह मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. चालकाचे नाव समजू शकले नसल्याची माहिती शाहूवाडी पोलिसांनी दिली.

गॅस गळतीच्या भीतीने खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मार्गावरील परिसरातील दोन किलोमीटर परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलही येथे दाखल झाले.