अडीच कोटीचे मशीन करणार कचऱ्यावर प्रक्रिया

सोलराईज्ड बायो कंपोस्टिंग मशिन खरेदी ; दरदिवशी १० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

रत्नागिरी:- घनकचरा प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न धुमसत आहे. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमुळे कचऱ्याला आग लागते. यामुळे धुराचे प्रदूषण आणि दुर्गंधीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कचरा व्यवस्थापनासाठी ओल्या कचऱ्यापासून दरदिवशी १० टन कचऱ्यातून खतनिर्मिती करणारे सोलराईज्ड बायो कंपोस्टिंग मशिन खरेदीचा पालिकेचा प्रयत्न आहे. या अत्याधुनिक मशिनमध्ये एकदा ओला कचरा टाकला की थेट खतनिर्मिती होते. त्यातून काहीच वाया जात नाही, असे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे.

पालिकेने प्रस्तावित केलेल्या या अत्याधुनिक मशिनची किंमत सुमारे अडिच कोटी आहे. त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून कोटेशन मागवण्यात आले आहे. ही मशिन आल्यास दरदिवशी गोळा होणाऱ्या १० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भविष्यात डंपिंग ग्राऊंड करण्याची गरजच भासणार नाही; परंतु ही सर्व प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रत्नागिरी पालिकेला नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे १० टन प्रतिदिन क्षमतेचे सोलराईज्ड बायो कंपोस्टिंग मशिन खरेदी करणे या कामी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पुरवठादारांकडून सविस्तर तांत्रिक तपशिलांसह दरपत्रक मागवण्यात येत आहेत.
शहराचे डंपिंग ग्राऊंडमधील घनकचऱ्याचा प्रश्न हळुहळू मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मिटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. पालिकेचे माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या प्रयत्नाने भिजत पडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याचा प्रयत्न केला होता. साळवी स्टॉप, कोकणनगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदींची समस्या कायमची सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ लाख रुपये खर्च करून ४ हजार क्युबिक मिटर कचरा कमी करण्यात आला तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडे ४४ लाखाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; मात्र याचा पाठपुरावा न झाल्याने हा विषय पुन्हा भिजत पडला आहे. ओल्या कचऱ्यावर खतनिर्मिती करणारे सोलराईज्ड बायो कंपोस्टिंग मशिन खरेदी झाल्यास डंपिंग ग्राऊंड येथील धूर आणि दुर्गंधीचा प्रश्न सुटणार आहे.