खेड:- मुंबई – गोवा महामार्गावर भरणे नाका येथे नवभारत हायस्कूलसमोर बुधवारी रात्री १० च्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका ४९ वर्षीय प्रौढाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भरणे समर्थ नगर येथील गजानन सावंत हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठोकर देऊन वाहनचालक फरार झाला आहे.
अपघाताची खबर मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर भरणे नाका येथील स्थानिक रहिवासी अमित कदम, विनायक तोडणकर, संतोष नलावडे, करण पवार, अनिल पुजारी, अमोल जाधव, कल्पेश भोसले व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गजानन सावंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.