अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत महिला गंभीर जखमी

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील गावकरवाडी फाटा मेघी येथे दि. ०६ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद उदय नामदेव कोळवणकर (वय ६८ वर्षे, रा. गावकरवाडी फाटा मेघी, ता. संगमेश्वर) यांनी दिली आहे. फिर्यादी आणि त्यांची पत्नी हे दोघेही गावकरवाडी फाटा मेघी येथे घरी जाण्यासाठी खासगी वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्याचवेळी देवरुख बाजूकडून आलेल्या एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने फिर्यादी यांच्या पत्नीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे फिर्यादी यांची पत्नी डांबरी रस्त्यावर खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला. तसेच त्यांना इतरही लहान-मोठ्या दुखापती झाल्या. अपघात केल्यानंतर अज्ञात मोटारसायकलस्वार तेथे न थांबता निघून गेला.

याप्रकरणी देवरुख पोलिसांनी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.