अज्ञात कारणातून विवाहित तरुणाची आत्महत्या

खेड:- पतीने गळफास घेतलेली दोरी पत्नीने चाकूच्या साहाय्याने कापून पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आणि पतीचा मृत्यू झाला. ही घटना ३० रोजी सायंकाळी शहरातील साळीवाडा येथे घडली. अमोल अनंत तांबडे (४०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

शहरातील साळीवाडा येथील अमोल अनंत तांबडे (४०) यांनी राहत्या घराच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. अमोल अनंत तांबडे यांनी ३० मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घराच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने पतीला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. प्रसंगावधान दाखवत तिने गळफासाची दोरी चाकूने कापली. हा दोर कापताच अमोल तांबडे जमिनीवर खाली पडले.

त्यानंतर पत्नीने त्यांना तातडीने उपचाराकरिता कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने रुग्णालयातच टाहो फोडला. अमोल तांबडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे. अमोल तांबडे यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा उलगडा झालेला नाही. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.