रत्नागिरी:- विमान अपघातात निधन झालेले अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून रत्नागिरीला भरभरून निधी दिला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आणि किनाऱ्याची धुप होऊन नागरिकांच्या सात-बारावर आलेल्या मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी त्यांनी सुमारे पावने दोनशे कोटींचा भरीव निधी दिला. मिऱ्यावासीयांचे समुद्रापासून संरक्षण झाले. अजित पवार यांचे कोणावर विशेष प्रेम असल्याने ते वारंवार कोणकात येत होते. परंतु १७ मार्च २०२५ चा या ‘दादा’ माणसाचा दौरा अखेरचा ठरला. त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्य वर्धन केंद्राच्या भुमिपूजन कार्यक्रम केला. राज्यातील पहिल्या मल्टीमिडिया थ्रीडी शोचा आनंद घेतला. रत्नागिरीचा विकासाचा सारथी हरपला असेच म्हणावे लागले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रासह कोकणच्या विकास प्रक्रियेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून दिलेले योगदान आणि त्यांचे या भूमीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जिल्हावासीयांच्या सदैव स्मरणात राहील. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून समुद्राच्या उग्र रूपामुळे धास्तावलेले होते. समुद्राच्या उधाणामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन लोकांच्या जमिनी, अगदी सात-बारावरील नोंदीही समुद्रात वाहून जात होत्या. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न अजित पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीनुसार मार्गी लावला. त्यांनी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी सुमारे पावणे दोनशे कोटींचा भरीव निधी मंजूर केला. आज या बंधाऱ्यामुळे मिऱ्यावासीयांच्या घरांचे आणि जमिनींचे समुद्रापासून कायमचे संरक्षण झाले आहे.
१७ मार्च २०२५ चा दौरा हा ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांचा रत्नागिरीतील अखेरचा दौरा ठरला. या दौऱ्यात त्यांनी केवळ भाषणांवर भर न देता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्य वर्धन केंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, जे भविष्यात कोकणच्या युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडणारे ठरेल. श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथील विकास कामांची पाहणी तेव्हा त्यांनी केली. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे निर्माण आणि विकासकामाचा लोकार्पण त्यांच्याहस्ते झाला.
याच दौऱ्यात त्यांनी राज्यातील पहिल्या मल्टीमीडिया थ्रीडी शोचा आनंद घेतला, जे त्यांच्या आधुनिक पर्यटनाच्या दृष्टीचा पुरावा होता. यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत यांचे भरभरून कौतुक केले होते.
कोकणाशी अतूट नाते
अजित पवारांचे कोकणावर विशेष प्रेम होते, म्हणूनच ते वारंवार या भागात येत होते. येथील विकासकामात त्यांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. शब्दाचा पक्का नेता म्हणून त्यांनी रत्नागिरीच्या प्रलंबित प्रकल्पांना गती दिली. १७ मार्चच्या त्या अखेरच्या भेटीत त्यांनी दिलेली आश्वासने आणि केलेली कामाची पाहणी आज आठवणींच्या रूपाने रत्नागिरीकरांच्या मनात जिवंत आहे. विकासकामांच्या माध्यमातून ‘दादांनी’ रत्नागिरीच्या किनारपट्टीवर उमटवलेला ठसा कधीही पुसला जाणार नाही.









