अखेर नवव्या दिवशी लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांना मिळाला न्याय

 1 ऑगस्टपर्यंत अधिसंख्य पदाचे आदेश मिळणार

रत्नागिरी:-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी टिपणी ठेवण्याची अव्वल कारकून यांना सूचना दिल्या. तसेच पुढील 1 ऑगस्ट पर्यंत अधिसंख्य पदाचे आदेश द्यायचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी मान्य केल्यामुळे हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.  
   

अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन(आफोह) या संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनाची दखल  गेले 8 दिवस झाले तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे उपोषण सुरूच ठेवण्यात आले. भर मुसळधार पावसातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशदारासमोर सुरू असलेले देशमुख कुटुंबीय व आफोहच्या पदाधिकारी-सभासदांच्या  उपोषणाकडे  पशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी केला होता. जिल्हा प्रशासन  निद्रीस्त झाले आहे की काय?,असा सवाल आफोहच्या वतीने करण्यात आला.  

जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक- टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे ह्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन,चे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी लिपिक टंकलेखक विलास देशमुख यांच्या अधिसंख्य पदाच्या नेमणूकीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल शासनाच्या महसूल व वन विभागाने घेतली. मात्र शासनाच्या मंत्रालयातील महसूल विभागाने या प्रकरणातील दिलेल्या आदेशाचे तीन पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयाने दाबून ठेवल्याचे उघड झाली. प्रशासनाच्यावतीने यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. बुधवारी विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी टिपणी ठेवण्याची अव्वल कारकून यांना सूचना दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. तसेच पुढील 1 ऑगस्ट पर्यंत अधिसंख्य पदाचे आदेश द्यायचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी मान्य केले. त्यामुळे हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.