मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
खेड:- खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा पडदा अखेर अठरा वर्षांनंतर उघडला. रविवारी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे भव्य लोकार्पण उत्साहात पार पडले. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार भरत गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्चून आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेले हे नाट्यगृह अठरा वर्षांनंतर पुन्हा रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले आहे. या लोकार्पणामुळे खेडच्या सांस्कृतिक वाटचालीला नवे बळ मिळाले असून, संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले, “२००९ पासून या सांस्कृतिक केंद्राकडे कोणीही लक्ष दिलं नव्हतं. मात्र योगेश कदम यांनी संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे काम करत हे केंद्र पुन्हा उभं केलं.” तसेच, काही नेत्यांकडून योगेश कदम यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी जोरदार टीका केली. “ज्यांनी पालकमंत्री असताना एक रुपयाही दिला नाही, तेच आज आरोप करत आहेत. मात्र आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने योगदान दिलं आहे,” असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी सांस्कृतिक केंद्रासाठी ८० लाखांची प्रशासकीय मंजुरी पुढील तासाभरात जिल्हा नियोजनातून दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच, खेड बसस्थानकासाठी दोन कोटींची मंजुरी दोन दिवसांत मिळेल आणि शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. “कोकणची गरज ओळखून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणची खरी सेवा केली आहे,” असे उदय सामंत यांनी नमूद केले.