अक्षय्य तृतीयेला तीस हजार हापूस पेटी रत्नागिरीतून वाशी बाजारात 

रत्नागिरी:- साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेला यंदा वाशी बाजारात तीस हजार पेटी आंबा दाखल झाला होता. पेटीचा दरही एक ते दोन हजार रुपयांपर्यंत स्थिरावला आहे; मात्र बाजारापेठेतील खरेदीवर यंदा कोरोनाचे सावट होते.

सणांच्या परंपरेत अक्षय तृतीया हा खूप मानाचा सण मानला जातो. मोठ्या खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणार्‍या या मुहूर्तावर विवाहही मोठ्या प्रमाणात होतात. सोने खरेदीकडे सर्वाधिक कल असतो; परंतु यावर्षी त्यावर बंधने आली. कोरोनातील परिस्थितीचा सोहळ्यांवरही मोठा परिणाम झाला. त्यामुळे अपेक्षित अक्षय तृतीया साजरीच झाली नाही. संचारबंदीमुळे बाजारापेठांवरही बंधने होती. अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य विक्री व्यावसायात अपेक्षित खरेदी लोकांना करता आलेली नाही. सरकारने विविध कार्यक्रमांवर बंदी आणताना लग्नसोहळ्यांनाही नियम लावले. विवाह सोहळ्याला केवळ 50 लोक उपस्थित राहण्याला परवानगी देण्यात आली. त्यात वेळेचे बंधन नव्हते. मात्र, आता दुसर्‍या टप्प्यात उपस्थिती 25 वर आली आहे आणि केवळ दोन तासांचाच वेळ देण्यात आला आहे. इतक्या कमी उपस्थितीत आणि कमी वेळेत लग्न केवळ उरकावे’ लागत असल्याने ते टाळण्यावरच भर दिला जात आहे.

अक्षय तृतीयेला मुंबई, पुण्यात मोठ्याप्रमाणात आंबा खरेदी होत असते. त्यानुसार दरही कमी आल्यामुळे ग्राहक वर्ग वाढला होता. वाशी मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. 14) तीस हजार पेटी आंबा दाखल झाला होता. पाच डझनच्या पेटीला दोन हजार रुपये तर त्याखालोखाल दर्जाच्या आंब्याला एक हजार रुपये पेटी दर मिळत होता. यावर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे हापूसचे दरही वधारलेले होते. दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी खरेदीसाठी धाव घेतली होती.