रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील ज्या मिळकती निवासी, वाणिज्य, औद्योगिक या झोनमध्ये समाविष्ट आहेत. परंतु, अद्यापही अकृषिक परवानगी घेतलेली नाही अशा मिळकतींना बिनशेती सनद देण्यासाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी येथे विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 (ब) नुसार कोणत्याही क्षेत्रात अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यावर आणि जिथे अंतिम विकास योजना अगोदरच प्रसिद्ध करण्यात आली असेल तेथे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या अर्जावरून किंवा स्वतःहून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 47 अ मध्ये नमुद केलेल्या दराने रूपांतरण कर आणि त्या विकास योजनेत दर्शविलेल्या वापराच्या आधारे अशा जमिनीस अकृषिक आकारणी निर्धारित करील असे नमुद आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांच्या 13 एप्रिल 2022 शासन परिपत्रकान्वये वरील नमुद मिळकतींना शासनाचे प्रचलित तरतूदीनुसार अकृषिक सारा व रूपांतरीत कर शासन जमा करून घेतल्यानंतर संबंधितांना बिनशेती सनद देण्याचे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
सनद मिळविण्यासाठीचा अर्ज तहसीलदार कार्यालयातून घ्यावा सोबत चालू 7/12 किंवा मिळकत पत्रिका (3 महिन्याच्या आतील), सर्व फेरफार उतारे, स.नं./गट नं./सिटी, स.नं. झोन दाखला (नगरपरिषदेकडून घेणे), क्षतीपत्र (सेतूमधून करून घेणे), प्रतिज्ञापत्र (सेतूमधून करून घेणे) इत्यादी कागदपत्रे जोडून सदर दिवशी कार्यालयात परिपूर्ण प्रकरण जमा करावे, असे तहसीलदार रत्नागिरी शशिकांत जाधव यांनी कळविले आहे.









