अंमली पदार्थ सापडलेल्या खलाशांच्या नौका मालकांवर कारवाईची शक्यता ?

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात होत आहेत. मच्छीमार नौकांवर काम करणार्‍या खलाशांकडे गांजा मिळून येण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे जे खलाशी अंमली पदार्थ संबंधित कारवाईत सापडतील त्यांच्या नौका मालकांवर कारवाई होऊ शकते का? याबाबत पोलिसांकडून कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केला जात आहे.

जिल्ह्यात सुमारे 3900 यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी नौका आहेत. यामधील पर्ससीननेट नौकांवर मोठ्या प्रमाणात खलाशी काम करतात. एकेका नौकेवर सुमारे 35 खलाशी काम करतात. बहुसंख्य खलाशी नेपाळी किंवा परप्रांतीय आहेत. ज्या नौकांवर हे परप्रांतीय नेपाळी काम करतात ते धुंदीत किंवा नशेत अधिक काम करावे, यासाठी मालकांकडून त्यांना गांजा किंवा तत्सम अमली पदार्थ पुरविले जात असावेत, असा संशय आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत अमली पदार्थ विरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. परंतु पोलिसांना ते अमली पदार्थ कोणाकडून येतात, याचा तपासात सुगावा लागण्यात अडचणी येतात. त्यामुळे जे काही पहिले आरोपी आहेत, तेवढ्याच कारवाईवर पोलिसांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे आता त्यांचे लक्ष नौका मालकांकडे वळण्याच्या बेतात आहे.रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर हे कोकणातील मोठे बंदर आहे. या बंदराच्या ठिकाणी असलेल्या जेटींवर 300 नौका उभ्या करण्याची सोय आहे. परंतु प्रत्यक्षात 600 पेक्षा अधिक मच्छीमार नौका येथे दाटीवाटीने उभ्या करून मासळी उतरवून घेतात. या बंदरावर वर्दळही मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी अमली पदार्थविरोधी कारवाया झाल्या आहेत. यामध्ये खलाशांचा भरणा असल्याने या खलाशांना संबंधित नौका मालकच अमली पदार्थ पुरवतात, असा संशय आहे. ज्या नौकेवरील खलाशी या कारवाईत आढळतील, त्यांच्या नौका मालकांवरही कारवाई करण्याची कायदेशीर तरतूद आहे का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.