अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाड्या बंद

रत्नागिरी:- विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २ हजार २२३ अंगणवाडी सेविका व १ हजार ४५३ मदतनीस सहभागी झाल्याने अडीच हजार अंगणवाड्या बंद होत्या. यामुळे अंगणवाडीतील किलबिलाट थांबला होता.

जिल्ह्यातील २ हजार ८७१ अंगणवाडीमधील २ हजार ७४९ अंगणवाडी सेविकांपैकी २ हजार २२३ सेविका तर १ हजार ८५८ मदतनीसांपैकी १ हजार ४५३ मदतनीस या संपात प्रत्यक्ष सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती प्रभारी महिला बालकल्याण अधिकारी नयना हिंगोले यांनी दिली. यामुळे अडीच हजार अंगणवाड्या मंगळवारी बंद राहिल्या होत्या. कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांना अल्प मानधन मिळते. गेली ४८ वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने अंगणवाडी ताईंचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन देऊन प्रजासत्ताकदिनाची तारीखही जाहीर केली होती. मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्राचे भाडेही गेल्या वर्षापासून राज्य सरकारकडून न मिळाल्याने अंगणवाड्या बंद करण्याचा तगादा जागा मालक लावत आहेत. ते टाळण्यासाठी अनेक अंगणवाडी ताईंनी कर्ज घेऊन संबंधितांचे भाडे देऊन जागा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष संज्योती शिंदे यांनी दिली.