हॉटेलमध्ये जेवण करताना वृध्दाचा उलटी होऊन मृत्यू

चिपळूण:- चिपळूण शहरातील पाग परिसरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेवताना मळमळ होऊन उलटी झाल्याने ते जमिनीवर कोसळले आणि काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

​मिळालेल्या माहितीनुसार, फैय्याज हसन कासकर (वय ५५, रा. पाग, कासकरआळी, ता. चिपळूण) हे शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी चिपळूण येथील हॉटेल सद्गुरू येथे जेवण्यासाठी गेले होते. जेवण करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणातच त्यांना उलटी झाली आणि ते खाली पडले.

​कासकर खाली पडल्याचे पाहताच हॉटेलमधील कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने कासकर यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेची नोंद चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.