हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर मुंबई – गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, होम डीवायएसपी फडके मॅडम, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच शहर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून आजूबाजूच्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधील गळती सध्या नियंत्रणात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून हातखंबा तिठ्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक हातखंबा तिठा येथे तत्काळ थांबविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विवेक पाटील याठिकाणी नियोजन पाहत आहेत.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातखंबा ते लांजा मार्गासाठी कुवारबाव मार्ग खुला करण्यात आला असून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बावनदी मार्गे वळवण्यात येत आहे. दरम्यान, हातखंबा- पाली मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.