हातखंबा येथे अपघाताची मालिका; सलग तिसऱ्या दिवशी तिसरा अपघात

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गाव टापूत २७, २८ व २९ जानेवारी अशी सलग तीन दिवस ट्रकच्या अपघातांची मालिका सुरू आहे. हातखंबा दर्ग्यावळच गुरूवारी रात्री ट्रक उलटून दुसरा अपघात झाला. त्यात तिघे जखमी आहेत. तसेच शुक्रवारी कापडगाव बसस्थानकाजवळ आणखी एक ट्रक उलटून अपघात झाला आहे.

हातखंबा गाव येथील बसस्थानकाजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात दुचाकीवरील बापलेक ठार झाले तर दुचाकीस्वाराची पत्नी गंभीर जखमी झाली. गुरूवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथील दरग्याजवळील तीव्र उतारावर कोल्हापूरहून जयगडला चाललेला ट्रक क्र. एमएच २५-टी ५२४७) नियंत्रण सुटल्याने उजवीकडे उलटला. त्याने समोरुन रत्नागिरीहून कापडगावला चाललेल्या मोटारसायकल नं. एमएच०८-एटी ९५५१ ला धडक दिली. त्यात संदेश गणपत कोत्रे (३५, रा. कापडगाव कोत्रेवाडी) हे जखमी झाले. अपघातात ट्रकचालक व्यकटभीम सरोदे (३५) व त्याचे वडील भीम कृष्णा सरोदे (६५) हे दोघे रा. उमरगा (उस्मानाबाद) किरकोळ जखमी आहेत. तिसरा अपघात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कापडगाव येथील उतारावर बसस्थानकाजवळ झाला. येथे कर्नाटकातून आलेला ट्रक (केए ४८-९६३७) रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या मोटारसायकल न. एमएच ०२ एजे १९०९ ला धडकला. यावेळी मोटारसायकलस्वार विश्वनाथ मनोहर कोत्रे (रा. कापडगाव) पेट्रोलपंपावर गेल्याने वाचले.