हातखंबा येथील अपघातात वडील ठार तर आई, मुलगा जखमी

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात बुधवारी रात्री झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ट्रकच्या धडकेत मोटरसायकल वरील तिघेजण फेकले गेले तर दुचाकी ट्रकसोबत 200 मीटर फरफटत गेली होती. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. 

अपघातात ठार झालेला दुचाकीस्वार राजेश महादेव धुमक (वय ३४) तर जखमी पत्नी ऋतुजा राजेश धूमक (वय ३०) व मुलगा साईश धूमक (वय ४) यांचा समावेश आहे. हे सर्वजण झरेवाडी येथील राहणारे आहेत. हे दांपत्य आपल्या मुलाला दवाखान्यात उपचार करण्यासाठी रत्नागिरीत आले होते. हातखंबा गावातील बस स्थानकाजवळ एक आरामबस उभी असताना मागील उतारावरून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या दुचाकीस्वाराला उडवले. अपघात एव्हढा भीषण होता कि त्या ट्रकने मोटारसायकलला २०० मीटर फरफटत नेले. जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मुन्ना देसाई व गावातील तरुणांनी मदतीला धावत जखमींना इस्पितळात हलवण्यास मदत केली.