Wednesday, June 10, 2026
spot_img
Home राजापूर स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

साखरी-नाटे परिसरावर शोककळा

राजापूर:- कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे साखरी-नाटे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोतवडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हसन सलमान कोतवडेकर (वय ६, रा. साखरी-नाटे) हा आपल्या कुटुंबीयांसमवेत कोतापूर फाटा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी गेला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात असलेल्या हसनचा निरागस हास्याने भरलेला दिवस काही क्षणांतच दुःखद ठरला.

सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विमिंग पूल परिसरात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हसन पाण्यात बुडाला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

काही क्षणांपूर्वी कुटुंबीयांसोबत आनंदाने वावरणारा हसन अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू आणणारा ठरला. एका निष्पाप जीवाचा असा अकाली अंत झाल्याने परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार पाण्यात बुडून गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर येथे पाठविला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या हृदयद्रावक घटनेमुळे साखरी-नाटेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका उमलत्या कळीचे आयुष्य अकाली संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून कोतवडकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.