स्वतःच्या शरीराचे संवर्धन करा, तरच समाजसेवा घडेल: डॉ. अलिमीया परकार

परकार हॉस्पिटल व रिक्षा संघटनेच्या वतीने ‘सीपीआर’ प्रशिक्षण; शेकडो चालकांची उपस्थिती

रत्नागिरी:- प्रत्येक माणूस हा समाजाचा एक उपयुक्त घटक आहे. समाजासाठी काम करत असताना त्याला मान-सन्मान मिळायलाच हवा, मात्र समाजाचे ऋण फेडत असताना आपल्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही स्वतःच्या देहाचे संरक्षण आणि संवर्धन केले नाही, तर दुसरा कोणीही ते करणार नाही, असे प्रतिपादन परकार हॉस्पिटलचे डॉ. अलिमीया परकार यांनी केले.

​परकार हॉस्पिटल आणि रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सीपीआर’ प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रिक्षा चालकांना आरोग्याची त्रिसूत्री सांगून जीवनरक्षक कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले.

​या सोहळ्याला माजी आमदार राजन साळवी, ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार राजेश शेळके, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, माजी नगरसेवक सलील डाफळे, अविनाश कदम, नितीन तळेकर, सुभाष गोताड, सलीम जमादार, डॉ. अनुराधा लेले आदी मान्यवर उपस्थित होते.

​डॉ. परकार यांनी रिक्षा चालकांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “तासनतास एकाच जागी बसून रिक्षा चालवल्यामुळे पायांमध्ये गाठी होण्याच्या समस्या निर्माण होतात. व्यवसायाचा गाडा सांभाळताना शरीराकडे केलेले दुर्लक्ष भविष्यात महागात पडू शकते.
दररोज नियमित चाला, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या, धावपळीच्या जीवनात शरीराला किमान ८ तास विश्रांती द्या ही आरोग्यासाठी त्रिसूत्री आहे.”

​हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा काळ अत्यंत मोलाचा असतो. डॉ. परकार म्हणाले, “रस्ते अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रिक्षा चालक हे ‘प्रथम प्रतिसादक’ म्हणून काम करतात. सीपीआरचे योग्य प्रशिक्षण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. तुमच्या हातून कोणाचे तरी प्राण वाचावेत, याच हेतूने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.”

​या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘सीपीआर’ कसा द्यावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित शेकडो रिक्षा चालकांनी याचे बारकावे समजून घेतले. याप्रसंगी परकार हॉस्पिटलच्या वतीने सर्व चालकांना प्रथमोपचार किट वाटप करण्यात आले.