सेनेला आघाडी नको असेल तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार: बशीर मुर्तुझा

रत्नागिरी:- माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकामध्येही रत्नागिरीत आम्ही मुळ शिवसेनेच्या सोबत जाणार आहोत. शिवसेनेला जर आघाडी नको असेल तर स्थानिक पातळीवर आम्ही रत्नागिरी नगर पालिकेत 32 जागा लढवण्याची तयारी ठेवली असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी व्यक्त केली.

वरिष्ठ नेत्यांकडून ज्या पध्दतीने आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही भविष्यात पुढे जाणार आहोत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने, स्थानिक नगर पालिका, जि.प. व पंचायत समित्यांमध्ये एकत्र लढण्याची तयारी ठेवलेली आहे. रत्नागिरी नगर पालिकेत राष्ट्रवादीतून निवडून येऊन दुसर्‍या पक्षात गेलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. या नगरसेवकांना राष्ट्रवादीत यायचे असल्यास त्यांना पाच वर्ष पक्षासाठी काम करावे लागेल मग त्यांचा विचार केला जाईल असेही मुर्तुझा यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्या नेतृत्वात शहरात रस्ते व  अन्य विकास कामे झाली आहेत, त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे. नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते केले गेले. मात्र निवडणुका पावसाळ्यानंतर होणार असल्याने आता, रस्त्याची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात येईल असेही बशीर मुर्तुझा यांनी सांगितले. याबाबत वेळोवेळी राष्ट्रवादीचे मिलींद कीर व सहकार्‍यांनी आवाज उठवला असल्याचेही ते म्हणाले.
मविआ सरकार पडल्यामुळे त्याचे परिणाम आता ग्रामीण भागापर्यंत दिसणार आहेत. बंडखोरांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जबाबदार धरले. मात्र यात तथ्य नाही. मविआ सरकारने ठरवल्याप्रमाणे स्थानिक आमदारांच्या पत्राशिवाय मतदार संघात कोणतेही विकास कामे होत नव्हती. आम्ही काही कामे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. मात्र त्यांनी आपल्याला स्थानिक आमदारांचे पत्र घेऊन या असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीवर होत असलेल्या आरोपात काही तथ्थ्य नसल्याचे बशीर मुर्तुझा यांनी सांगितले.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात काही महिन्यापूर्वीच जवळपास अडीचशे कोटीहून अधिकचा निधी तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाच्या आमदारांना अजितदादांनी नाराज केले नव्हते. आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ गराटे आदी उपस्थित होते.