रत्नागिरी:- मिर्या-नागपूर महामार्गावर साळवी स्टॉप ते टीआरपी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी केलेल्या अनधिकृत बांधकामांचे व्हिडिओ, फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत. ती हटविण्याची सात दिवसाची पहिली नोटीस दिली आहे. संबंधितांना पुढच्या आठवड्यात वकिलामार्फत दुसरी नोटीस देऊ. स्वतंत्र यंत्रणेद्वारे ही बांधकामे हटविण्यात येतील, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयातील साईट इंजिनिअर व्ही. एन. पाटील यांनी दिली.
मिर्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादन आणि मोबदला वाटप प्रक्रिया सुरू आहे. कुवारबाव बाजारपेठ यात उद्ध्वस्त होत असल्याने चौपदरीकरणाला विरोध केला होता; मात्र शासनाने विरोध झुगारून सुमारे पंचेचाळीस मीटरचे भूसंपादन केले आहे. परंतु महामार्गाचा वेगळाच विषय पुढे आला आहे. साळवी स्टॉप ते टीआरपीदरम्यान महामार्गाच्यामध्ये रिकामी जागा आहे. तसेच साळवी स्टॉप येथे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पक्की अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. रातोरात सुमारे सव्वाशे ते दीडशे बांधकामे उभी राहिली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच एमआयडीसीकडे अनेकांनी तक्रारी केल्या; मात्र पुढे काहीच झाले नाही. बांधकामे सुरूच आहेत. मंत्र्यांपर्यत हा विषय गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मिर्या-नागपूर महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे अधिकार त्यांनाच आहेत.
प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयाचे साईट इंजिनिअर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साळवी स्टॉप ते टीआरपी दरम्यान होणार्या अनधिकृत बांधकामाची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. ही बांधकामे हटविण्याच्या अनुषंगाने गेल्या महिन्यातच सुमारे 100 जणांना नोटिसा बजावून सात दिवसात बांधकाम हटविण्यास सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात आमच्या वकिलामार्फत त्यांना नोटिसा बजावण्यात येतील. त्यानंतर स्वतंत्र यंत्रणा उभारून ही अनधिकृत बांधकामे हटविण्यात येतील.









