रत्नागिरी:- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘सायबर वॉरियर क्लब’ आणि ‘क्विक हील फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत शहरातील एस. एस. मोबाईल येथे नुकतेच सायबर जागरूकता सत्र पार पडले. वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत सजग राहावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
सत्रात फायनान्शियल फ्रॉड, ओटीपी फ्रॉड, ॲप परवानग्या (अॅप परमिशन) आणि मॉर्पिंग यांसारख्या सायबर धोк्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन व्यवहारा वेळी कोणालाही ओटीपी किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंक्सपासून दूर राहावे आणि मोबाईलमध्ये ॲप्स इन्स्टॉल करताना त्यांच्या परवानग्या काळजीपूर्वक तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच, सोशल मीडियावर फोटो किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाच्या काळजीबाबतही सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. या सत्रात सायबर वॉरियर्स सृष्टी पाटील आणि श्रवण बोथळे यांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एस. एस. मोबाईलचे व्यवस्थापक सुशांत वडगावे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्राला १५ नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली.









