रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार नौकांना तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 1 लाख मेट्रिक टनपेक्षा मासळी पकडण्याचा योग आला. सन 2014 – 15 मध्ये 1 लाख 15 हजार 42 मे. टन मत्स्य उत्पादन मिळाले होते. त्या नंतर हे मत्स्य उत्पादन हजारांच्या मे. टन मध्येच मिळत होते. मात्र यंदा सन 2021-22 मध्ये 1 लाख 12 हजार मे. टन मासळी मिळाली आहे. गेल्या दीड महिन्यात चांगले उत्पन्न मिळवून देणारे बांगडा, तारली मासे मोठ्या प्रमाणात मिळाले. यांत्रिकी, बिगर यांत्रिक अशा सर्व नौकांना मच्छीचा चांगला ‘रिपोर्ट’ मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्र किनारा आहे. यामध्ये मंडणगडात 20 कि.मी., दापोली 35 कि.मी., गुहागर 38 कि.मी., रत्नागिरी 56 कि.मी. आणि राजापूर तालुक्याला 18 कि.मी. चा समुद्रकिनारा आहे. या समुद्रात सद्यस्थितीत 2 हजार 936 मच्छीमार नौका मासेमारी करत आहेत. यामध्ये यांत्रिकी नौकांची संख्या 2 हजार 252 इतकी आहे. अनेक मच्छीमार नौकांचे मासेमारी परवाने विहीत मुदतीत नूतनीकरण करून घेतलेले नाहीत. त्यामुळे सन 2021-22 मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाकडील मासेमारी परवाना असलेल्या नौका कमी दिसत आहेत. 2016-17 साली 3 हजार 84 मच्छीमार नौका होत्या.
जिल्ह्याच्या अर्थकारणातील महत्वाचा घटक म्हणून मासेमारी उद्योगाकडे पाहिले जाते. परंतू 2016 साली शासनाने काढलेल्या अद्यादेशामुळे पर्ससीननेट मासेमारीचा कालावधी 8 महिन्यांवरून 4 महिन्यांवर आला. त्यात नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागल्याने मच्छीमारांसमोर मोठे संकट आले होते. परंतु, यंदा सर्वच प्रकारच्या नौकांना चांगली मासळी मिळाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या मासळी उत्पादन नोंदीवरून दिसून येत आहे.
शासनाचा अध्यादेश लागू होण्यापूर्वी मच्छीमार नौकांना मिळणारा मच्छीमाचा रिपोर्ट चांगला होता. सन 2009 -10 मध्ये 2 हजार 573 नौकांना 75 हजार 122 मे. टन मासळी मिळाली होती. सन 2012-13 मध्ये 87 हजार 690 मे. टन तर 2013-14 साली 1 लाख 6 हजार 852 मे. टन मासळी मिळाली होती. त्याचबरोबर सन 2014-15 मध्ये 2 हजार 597 नौकांना 1 लाख 15 हजार 42 मे. टन मासळी मिळाली होती. त्यानंतर पर्ससीननेट मासेमारीचा कालावधी अद्यादेशानुसार 8 महिन्यांवरून 4 महिन्यांवर आला. त्यामुळे मासळीचे उत्पादन फारच कमी होते. ज्यावेळी अध्यादेश लागू झाला त्या पूर्वीच्या सन 2016-17 मध्ये तब्बल 3 हजार 84 मच्छीमार नौकांना 98 हजार 446 मे. टन मासळी मिळाली होती. मासेमारीचा कालावधी 4 महिन्यांचा सुरु झाल्यानंतर मत्स्य उत्पादनात लक्षणीय घट झाली होती.
कोव्हीड संकट काळातही मत्स्यउत्पादनावर परिणाम झाला होता. सन 2019-20 मध्ये 2 हजार 936 मच्छीमार नौकांना 66 हजार 173 मे.टन, सन 2020-21 मध्ये 65 हजार 374 मे.टन मासळी मिळाली होती. सध्या ही अध्यादेशाचा अंमल सुरु असतानाही मासळीची रिपोर्ट लाखाच्या पार गेला आहे. सन 2021-22 मध्ये 1 लाख 12 हजार 28 मे. टन मासळी मिळाली आहे.