साडेचार हजाराहून अधिक मच्छिमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या

रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशानुसार 1 जूनपासून मासेमारी बंदी सुरु होत असून अनेक मच्छीमारांनी नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरवात केली आहे. साडेचार हजाराहून अधिक मच्छिमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. मात्र, यंदा अजुनही पावसाची चिन्हे नाहीत, समुद्रही खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून काही मच्छीमार समुद्रात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मत्स्य विभागाकडून करडी नजर ठेवली जाणार असून बंदरांवर अधिकारी नेमण्यात येणार आहेत.

जानेवारीपासून पर्ससीननेटद्वारे मासेमारी करण्यासाठी बंदी असते. तर ट्रॉलिंग किंवा यंत्राद्वारे मासेमारी करणार्‍यांसाठी 31 मे रात्री बारा वाजल्यानंतर बंदी कालावधी सुरु होता. ही बंदी पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी असते. गेल्या काही दिवसात अनेक मच्छीमारांनी मासळी मिळत नसल्याने नौका किनार्‍यावर ओढण्यास सुरवात केली होती. कर्नाटक, नेपाळसह विविध राज्यातून आलेले खलाशीही माघारी परतले आहेत. काही मच्छीमारांनी जाळी सुखवून सुरक्षित ठेवली आहेत. तर काहींनी रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे जाळी सुकवण्यासाठी ठेवली आहेत. नौकांची तात्पुरती डागडुजीही केली आहे. मिरकरवाडा बंदरात पाचशेहून अधिक नौका उभ्या करुन ठेवल्या आहेत. पावसाळ्यात वादळ, वारे याचा धोका असल्यामुळे नौका सुरक्षित लावलेल्या आहेत. पांढरा समुद्र येथे छोट्या यांत्रीकी नौका क्रेनच्या साह्याने किनार्‍यावर आणलेल्या आहेत. त्यावर प्लास्टीक कव्हर टाकले आहे.

मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आकाशही निरभ्र असून समुद्र खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून मच्छीमारी सुरु राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मत्स्य विभागाने मासळी उतरवणार्‍या जिल्ह्यातील 27 केंद्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी क्षेत्रीय परवाना अधिकारी, सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत.