रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात साखरतर येथे कोरोना बाधित सापडलेल्या महिलेला सिव्हिलमध्ये आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. ही महिला न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजाराने आधीपासूनच ग्रस्त आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या घरातील आणि खासगी रुग्णालयातील कर्मचारी यांची तातडीने तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
साखरतर अकबर मोहल्ला येथील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. या महिलेच्या घराशेजारी मुंबई येथून आलेले जमातीचे काहीजण वास्तव्याला आहेत. हे सर्वजण क्वारंटाईन असून यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले. या महिलेच्या कुटुंबात 15 जण आहेत. यापैकी अगदी जवळच्या नातेवाईकांची सिव्हिलमध्ये आणून तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित महिला काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील खासगी डॉक्टर कडे उपचारासाठी आली होती. ज्या डॉक्टरकडे उपचारासाठी महिला गेली होती त्या डॉक्टरसह हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. हॉस्पिटलच सीसीटीव्ही तपासून ज्या कर्मचाऱ्यांचा त्या महिले सोबत संपर्क आला आहे त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित महिला ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे तो साखरतरचा भाग तात्काळ सील करण्यात आला आहे असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनि सांगितले. तसेच 3 कि मी चा भाग बंद करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यानुसार शिरगाव, काळबादेवी आणि बसणी ही गावे लवकरच सील करण्यात येतील. 3 कि मी परिसरात फवारणी करण्यासह ग्रामस्थांची तपासणी देखील करण्यात येणार आहे.