मिशन कवच कुंडल मोहीमेला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी :- जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्त 8 ते 14 ऑक्टोबर कालावधीत मिशन कवच कुंडल मोहीम राबवली जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत 59 हजार 861 जणांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यासाठी ग्रामपातळीवर समिती स्थापन करण्यात आली होती. लसीकरण न झालेल्यांची माहिती संकलीत करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या मोहिमअंतर्गत 8 ते 12 ऑक्टोबर या पाच दिवसात 69 हजार 861 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावासाठीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबत इतर विभागांची मदत घेतली जात आहे. लसीकरण ठिकाणची व्यवस्था लाभार्थीना लसीकरण ठिकाणी बोलावण्याची जबाबदारी इतर विभागाच्या कर्मचार्यांवर सोपविण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची जनजागृती केली असून दवंडी देणे, गृहभेटीसह सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या व दुसर्या मिळून 12 लाख 28 हजार 549 मात्रांचे वितरण झाले आहे. त्यात पहिला डोस 8 लाख 61 हजार 653 आणि दुसरा डोस 3 लाख 66 हजार 896 जणांनी घेतला आहे.









