Tuesday, October 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत ६५ हजार पर्यटकांची हजेरी

सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत ६५ हजार पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभर जाणवत असतानाच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत गणपतीपुळे मंदिरात सुमारे ६५ हजार पर्यटकांची नोंद झाली आहे.

त्याचबरोबर दापोली, गुहागरमध्येही पर्यटकांचा ओघ होता. त्यामुळे निवास व्यवस्थेसह हॉटेल, फेरीवाले यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच पर्यटकांनी सुटी काळात फिरण्याला पसंती दिली आहे. या कालावधीत जिल्ह्यात कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून केला जात आहे.

गणेशोत्सवानंतर आलेल्या पहिल्याच ‘लॉंग वीकेंड’मुळे पर्यटन व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारो पर्यटक रत्नागिरी, गुहागर, दापोलीतील प्रमुख पर्यटन स्थळे, स्वच्छ समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळांवर गर्दी करत होते. गुरुवारी सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस जिल्ह्यात थांबणे पसंत केले होते. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे, आरे-वारे, पावस, मांडवी, भाट्येसह राजापूरमधील कशेळी येथे पर्यटकांचा ओघ सर्वाधिक होता.

आरे-वारे येथील किनाऱ्यावर सलग दोन दिवसांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. येथील किनारी भागात सुरक्षेसाठी ठेवलेले दोन होमगार्ड गर्दी पाहिल्यानंतर पुन्हा नियुक्त करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी दोन जणांना आरे-वारे येथे वाचवण्यात यश आले. समुद्र व खाडीचा संगम असल्यामुळे तिथे पाण्याचा अंदाज येत नाही.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गणपतीपुळे किनारा पर्यटकांसाठी बंद केला होता. ऑगस्टच्या अखेरीस हा किनारा सुरू करण्यात आला. परंतु गणेशोत्सवात पर्यटनाला तेवढी चालना मिळालेली नव्हती. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील व्यवसायिकांना भविष्याची चिंता होती. त्यातच पाऊस कमी झाल्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. परंतु, या आठवड्यातील उलाढालीने पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

पर्यटन हंगामाची सुरुवात आशादायक असली तरीही भविष्यात हॉटेल व्यावसायिक आणि प्रशासनासमोर पाण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नद्या आणि धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलआधीच पाणीटंचाई जाणवेल. या कालावधीत पर्यटकांचा ओघ वाढता राहिल्यास पाणीपुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.