Tuesday, October 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी सन्मित्रनगर येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी

सन्मित्रनगर येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी

चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या सन्मित्रनगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा गजानन इंदुलकर (वय ६०, रा. विघ्नवली, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी जखमी महिलेचे मुलगे आदेश गजानन इंदुलकर (वय २९, व्यवसाय-कॉन्ट्रॅक्टर, रा. विघ्नवली देवरूख, ता. संगमेश्वर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

​त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक आरोपी प्रफुल्ल प्रकाश कांबळे (वय ३२, मूळ रा. आंबेडकरवाडी, रत्नागिरी, सध्या रा. जी-विंग ५०४, कारंवाचीवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १२९/१९४(ड) आणि भा.दं.वि. कलम २७९, ३३८, ३३७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रफुल्ल कांबळे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक MH 08 U 6952) कोणतीही हेल्मेट न घालता आणि रस्त्यावरील रहदारीचे गांभीर्य लक्षात न घेता अत्यंत जोरात व निष्काळजीपणे चालवत होता. सुमित्रनगर येथे रस्त्याने जात असलेल्या सुवर्णा इंदुलकर यांना या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या अंगावर व डोक्याला गंभीर आणि लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.

​घटना घडल्यानंतर रात्री १०.३६ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.