रत्नागिरी:- संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमवारी (ता. 8) गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात भाविकांची गर्दी होती. उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे दिवसभरात सुमारे 20 हजारहून अधिक भक्तांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले.
वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे श्रींच्या भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेला पुजाअर्चा झाल्यानंतर पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनाला सुरवात झाली. दर्शन रांगांमध्ये शिस्तबद्धपणे उभे राहून भाविक बाप्पाचे दर्शन घेत होते. संकष्टनिमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळेतर्फे मंदिरात श्रींच्या मूर्ती पुढे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी ही आरास केली होती. दिवसभर उन्हाचा कडाका असल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या पडलेल्या असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले पर्यटक श्रींचे दर्शन घेत होते. संकष्टीला अनेकवेळा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची सर्वाधिक गर्दी असते. यावेळी मे महिन्यातील संकष्टीला सर्वच जिल्ह्यातील भाविक उपस्थित होते. किनार्यावर गणपतीपुळे मंदिर देवस्थानतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी जाणार्यांवर लक्ष ठेवता येत आहे. ग्रामपंचायत, देवस्थान, पोलिस प्रशासनाने किनार्यावर जीवरक्षकांची नियुक्ती केली होती. तसेच बोटींग सुरु असल्यामुळे पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या पर्यटकांना आपसुकच संरक्षण मिळत आहे. सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आली. यावेळी अनेक भक्तगण सहभागी झाले होते. चंद्रोदयापर्यंत म्हणजेच रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती होती.









