Saturday, July 25, 2026
spot_img
Home राजकीय शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना बळजबरीने मोर्चात उतरवले

शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना बळजबरीने मोर्चात उतरवले

शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट आरोप

रत्नागिरी:- देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यासाठी, असा थेट सवाल उपस्थित करत महायुतीने (शिवसेना-भाजप) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने या मोर्चात आणल्याचा खळबळजनक आरोप करत महायुतीने याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. रत्नागिरीतील काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने या मोर्च्यामध्ये आणल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे असून, स्वतः विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केल्याचा दावा महायुतीने केला आहे. जर विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आले असते तर आमचा आक्षेप नव्हता, मात्र स्वतःचा राजकीय फायदा घेण्यासाठी निष्पाप मुलांचा वापर करण्यात आला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी असलेले विरोधकच आता रत्नागिरीतील मोर्चाचे नेतृत्व करत असून, या आडून देशप्रमुखांसह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा निषेध त्यांनी नोंदवला.

दरम्यान, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, नीट परीक्षेतील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून, बाधित विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र स्तरावर विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती महायुतीने दिली.

ज्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना या राजकीय आंदोलनात ढकलले, त्यांच्यावर तात्काळ व कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका पालकमंत्र्यांच्या वतीने महायुतीने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी महायुतीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करणाऱ्या आणि देशप्रमुखांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या घटकांविरोधात रीतसर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला