धडक देऊन चालक पसार
रत्नागिरी:- रत्नागिरी ते साखरतर मार्गावर शिरगाव गडगेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र मोहन नागवेकर (वय ५२, रा. शिरगाव गडगेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र नागवेकर हे शिरगाव गडगेवाडी बसस्थानक ते श्रद्धा पेट्रोल पंपाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने पायी चालत जात होते. त्यावेळी रत्नागिरीहून साखरतरच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या (क्रमांक एम.एच. ०८ – २७६९, उर्वरित पूर्ण क्रमांक अज्ञात) चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन भरधाव, अविचाराने आणि निष्काळजीपणे चालवले. सदर वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या नागवेकर यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नागवेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला, पायाला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्याऐवजी चालक गाडी न थांबवता घटनास्थळावरून भरधाव वेगाने पसार झाला.
या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष अशोक भालेकर (वय ४०, ब.नं. १११२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत असून, अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.









