रत्नागिरी:- शिमगोत्सवाच्या पार्श्वूमीवर गावागावात पूर्वापार सुरू असलेले वाद शमवण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. वारंवार या ठिकाणी बैठका, चर्चा घडवून आणत पोलीस दलाने जिल्ह्यातील ३४ पैकी २८ गावातील वाद सामोपचाराने मिटवले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही वर्षांपासून अनेक गावांमध्ये शिमगोत्सव-पालखी वरून विविध गटांत वाद-विवाद होते. हे वाद सोडवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी जिल्हा व प्रभारी पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठका घेण्यात आल्या.
या बैठकीनंतर जिल्ह्यातील ३४ पैकी २८ गावातील वाद सामोपचाराने मिटवण्यात पोलीस दलाला यश आले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील ४, गुहागर मधील २, संगमेश्वर मधील २, राजापूर मधील ३, नाटे मधील ३, देवरुख मधील ३, लांजा मधील ४ व चिपळूण मधील ३ गावातील वाद मिटविण्यात आले आहेत. यात गावातील ग्रामस्थांची पोलीस ठाणे व गावामध्ये वारंवार बैठका घेऊन व सुसंवाद साधून वाद सोडवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३४ पैकी २८ गावामधील पूर्वापार चालत आलेला वाद-विवाद सामोपचाराने मिटविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.
तसेच एकूण ६ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. शिमगोत्सव सामंजस्याने आणि सद्भावनेने केला जाईल, काळजी घेतली जाईल व उत्सवादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता रत्नागिरी पोलीस दल कटिबद्ध आहे व सदैव दक्ष आणि सक्रिय राहतील असे पोलीस दलाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
या प्रयत्नांमध्ये, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल ह्यांचे त्या त्या गावचे पोलीस पाटील, शांतता समिति सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्त समित्या ह्यांचे सहकार्य लाभत आहे.