शिमगोत्सवानंतर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ होणार

रत्नागिरी:- जिल्ह्यात अजून ४ दिवस २८ मार्चपर्यंत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवल्यामुळे रत्नागिरीकरांना ऐन शिमग्यात चार दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर होण्याची भिती आहे. प्रखर उन्हामुळे हापूसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात उष्मा जाणवत होता; मात्र शनिवारी (ता. २३) सकाळी किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ०.४ अंशांनी पारा कमी झाल्यामुळे सकाळच्या सत्रात थंडी होती तर दिवसभर ढगाळ वातावरणही होते. दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी थंडी, अशा विचित्र वातावरणामुळे आजार वाढले आहेत. कमाल तापमान ३२.५ अंशापर्यंत आहे. फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीत पारा ३७ अंशावर पोचला होता. हवामान विभागाने पुढील चार दिवसात पारा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान असेल तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज आहे. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असून, दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन जाईल, अशी स्थिती असेल.
मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाकडूनही काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यावे. फळांचा रस, पालेभाज्या, सॅलड घ्यावे. ताक, ऊसाचा रस याचा आहारात उपयोग करावा. उन्हाळ्यात कष्टदायक कामे टाळावीत. दुपारी बारा ते चार या वेळेत कष्टदायक कामे करू नयेत. विश्रांती घ्यावी. सैल व सुती कपडे वापरावेत, अशा सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ, रूमाल, गॉगल, छत्री वापरू लागले आहेत. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने पुढील काळात हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.