शिक्षण, संशोधन संदर्भात कोकण कृषी विद्यापीठ- थायलंड युनिव्हर्सिटीमध्ये सामंजस्य करार

रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- चुलालोन्गकोर्न युनिवर्सिटी, थायलंड नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. चुलालोन्गकोर्न युनिवर्सिटी, थायलंड येथे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील असे विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक प्रो. (डॉ.) प्रशांत बोडके यांनी सांगितले आहे.

विद्यापीठातील मत्स्य / कृषी आणि संलग्न विद्या शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी तसेच दोन्ही विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी यांना संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जागतिक बँक अनुदानित व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रकल्पांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. (डॉ.) संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथील नामांकित चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या दरम्यान शिक्षण, संशोधन या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार हा विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक प्रो. (डॉ.) प्रशांत बोडके आणि चुलालोन्गकोर्न विद्यापीठाचे अध्यक्ष प्रो. (डॉ.) बंदित युवा आरपोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) सानिपा सुरादत्त यांनी थायलंड येथील चुलालोन्गकोर्न विद्यापीठाने आयोजित केलेल्या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमादरम्यान भारतीय राजदूत, थायलंड येथील कार्यालयाचे डेप्युटी हायकमिशनर त्रिपाठी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.

हा सामंजस्य करार हा चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी मधील डॉ. नोपाडॉन, डॉ चन्नारॉग, डॉ अरण्य, डॉ मनोज आणि डॉ सीमा तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधील डा.@ बाळासाहेब चव्हाण आणि मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वप्निल जाधव, प्राची डोंगरे, देवरंजनी के. गार्गी पालेकर, रोहित आपटे, विराज दवंडे आणि अमरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सामंजस्य करार यांच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठातील मत्स्य / कृषी आणि संलग्न विद्या शाखेतील पदवी आणि पदवी उत्तर विद्यार्थी तसेच दोन्ही विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी यांना संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांची दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन करण्यासाठी संशोधन सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याच बरोबर दोन्ही विद्यापीठातील शिक्षक वर्गाची संशोधन कार्यासाठी देवाणघेवाण होऊ शकणार आहे.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी मध्ये मागील एक महिन्यापासून शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील एकूण सात विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक यांच्या करिता मत्स्य आणि मत्स्य संवर्धन या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दोन्ही विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने तिलापिया संवर्धनाच्या शाश्वत विकासातील प्रगती या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमादरम्यान चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) सानिया सुरादत्त यांनी भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक प्रो. (डॉ.) प्रशांत बोडके यांनी आपल्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील असे सूचित केले.

सामंजस्य करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिंगारे, राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्पाचे उप प्रकल्प समन्वयक डॉ. अतुल मोहोळ, डॉ. संतोष सावर्डेकर, संशोधन उपसंचालक डॉ. संजय तोरणे तसेच मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक प्राध्यापक, विभाग प्रमुख डॉ. अनिल पावसे आणि डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी मधील डॉ. मनोज आणि डॉ. सीमा यांचे सहकार्य लाभले. या करारावेळी चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी, थायलंड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करताना अधिष्ठाता प्रो. (डॉ.) प्रशांत बोडके आणि चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) सानिया सुरादत्त, भारतीय राजदूत, थायलंड येथील कार्यालयाचे डेप्युटी हायकमिशनर त्रिपाठी मॅडम, चुलालोन्गकोर्न विद्यापीठाचे अध्यक्ष प्रो. (डॉ.) बंदित युवा आरपोर्न, डॉ. नोपाडॉन, डॉ. चन्नारॉग, आणि डॉ. बाळासाहेब चव्हाण हे उपस्थित होते.