रत्नागिरी:- नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक शाळेवर रुजू होतील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर जाहिर केल्यानंतर संचमान्यतेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ती प्रक्रीया पूर्ण झाल्यावरच शिक्षक भरतीला आरंभ होईल. शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातत्याने होणार्या आंतरजिल्हा बदल्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शिक्षक भरा, अशी मागणी कोकणातील डीएड्, बीएड् धारकांनी केली आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल जाहीर होऊनही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांची संचमान्यता 15 मेपर्यंत अंतिम केली जाणार आहे. संचमान्यतेनंतर बिंदूनामावली प्रमाणित करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद पवित्र संकेतस्थळावर करणे, पहिल्या तिमाहीसाठीच्या जाहिरातींनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, शिफारस करणे आदी प्रक्रिया ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पवित्र प्रणालीवर रिक्त पदांच्या जाहिराती घेतल्या जातात. पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत पूर्वीच्या राज्यातील 12 हजार 70 पदांच्या भरतीत विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या एकूण 1 हजार 500 जागाही भरल्या जाणार आहेत. जूनमध्ये नवीन शिक्षक शाळेवर रुजू होतील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात अधिकारी मात्र ऑगस्ट महिन्याची डेडलाईन देत आहेत. त्यामुळे भरती प्रक्रीया प्रत्यक्षात कधी होणार याबाबत प्रतिक्षाच आहे.
विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी ?
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे सातशेपेक्षा जास्त शिक्षक जिल्हा बदली करून गेले आहेत. त्यात सध्याची व यापूर्वी झालेली सेवानिवृत्त्ती विचारात घेता सुमारे दीड हजार जागा रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त आहेत. हीच स्थिती सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी हा प्रश्न निर्माण होणार आहे.









