रत्नागिरी:- शहरातील जुनी बाजारपेठ, झारणीरोड आणि गवळीवाडा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. कधी कधी काळे आणि किडे असलेले पाणी नळाला येत असल्याने अनेकांना पैसे खर्च करून पाण्याचा टँकर घ्यावा लागत आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी विभागाकडून दूषित पाणी पुरवठ्याचा शोध घेतला जात आहे. रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेमधील अंतर्गत वितरण जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांमध्ये पाणीपुरवठा सुरु झाला आहे. काही ठिकाणी जुन्याच जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा होत आहे. अशा या दोन्ही जलवाहिन्यांमधून येणारे पाणी दुर्गंधीयुक्त असून काही वेळेला या पाण्यातून किडे सुद्धा येत आहेत. शहरातील ज्या भागात असा दूषित पाणीपुरवठा होत आहे. तेथील जलवाहिन्यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. परंतु, अद्याप कारणाचा पत्ता लागलेला नाही. गटारांजवळून जाणारी जलवाहिनी कुठे तरी फुटली असावी, असा अंदाज असून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.









