रत्नागिरीतील धोकादायक इमारतींवर रनपकडून नोटीस बोर्ड

रत्नागिरी:- ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी शहरातील धोकादायक असलेल्या तीन इमारतींमधील दुकानांमध्ये ग्राहकांनी जावू नये म्हणून ताकीद देणारा नोटीस बोर्ड त्या इमारतींवर लावले आहेत. या धोकादायक इमारतींमधील गाळेधारकांनी सुरक्षित स्थानी व्यवसाय स्थलांतरित करण्याची नोटीससुद्धा यापूर्वी बजावण्यात आली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या नवीन भाजी मार्केट, जुने भाजी मार्केट आणि विठ्ठल मंदिर समोरील इमारतींच्या गाळ्यांवर ताकीद देणारे नोटीस बोर्ड लावण्यात आले आहेत. नवीन भाजी मार्केट आणि विठ्ठल मंदिर समोरील इमारतीतील गाळे मोकळे करून रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस गाळेधारकांना बजावण्यात आली. या नोटीस विरूद्ध हे गाळेधारक न्यायालयात गेले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या इमारती वापरण्यासाठी धोकादायक असून ती कधीही कोसळू शकते. या इमारतीचा वापर करणाऱ्या गाळेधारकांना व नागरिकांना ताकीद देण्यात येते की, या इमारतीचा वापर धोकादायक आहे. इमारत कोसळून कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्यास रत्नागिरी नगर परिषद जबाबदार नाही, याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.