रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादनानंतर निवाडा तयार करून तो अंतिम मंजूरीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आलो होता. प्रांताधिकाऱ्यांकडुन नुकताच त्याचा आढावा घेतला. दर निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुंठ्याला पावणे २ लाख रुपये दर निश्चित होणार आहे. विमानतळासाठी एकुण ५६ एकर जमीनीचे भुसंपादन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बिबिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्याकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी तालुक्यातील तिवंडेवाडी परिसरातील सुमारे ५६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना काही महिन्यांपूर्वीच जाहीर केली. यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज (डीव्हीओआर) ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. विमानतळासाठी आवश्यक पॅरलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून निवाडा जाहीर करण्यात येणार आहे.
यावर बोलताना श्री. सामंत म्हणाले, विमानतळासाठी सुमारे ५६ हेक्टर जमीनीचे भूसंपादन झाले आहे. दर निश्चित करण्यात येत असून यापूर्वी त्याला गुंठा ४ हजार या प्रमाणे दर दिला जाणार होता. मात्र रेडिरेक्नरच्या दराचा विचार करून गुंठ्याला ४७ हजार रुपये दिले जाणार आहे. त्यावर वाढीव चारपट असा कुंठ्याला पावणे २ लाख रुपये दर खातेदारांना मिळणार आहेत. यामध्ये सुमारे ४००च्या वर खातेदार आहे.
आमदार उदय सामंत यांनी पावसात रत्नागिरी तालुका आणि जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेतला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात २९ घरांचांचे १४ लाख ९८ हजाराचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ४ गोठ्यांचाही समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ८०० हेक्टर भात पिकापैकी ५ हजार ६०० हेक्टरव लावणी पुर्ण झाली आहे. पाऊस चांगला झाला आहे, परंतु पूराची गंभीर परिस्थिती नाही. मात्र जे काही नुकसान होईल त्याला निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे कोकणला भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.









