रत्नागिरी:- वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जिल्ह्यात टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. सध्या खेड, चिपळूण व लांजा या तिन तालुक्यातील 5 गावांमध्ये टंचाई जाणवत असून तेथे टँकरने पाणी दिले जात आहे.
यंदा लांबलेला मोसमी पाऊस आणि सतत पडत असलेला अवकाळी पाऊस यामुळे भुगर्भातील पाणीपातळी बर्यापैकी स्थिर राहिली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज भुगर्भ तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे; परंतु लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला. त्यानंतर खेड, चिपळूण या दोन तालुक्यातील गावांमध्ये टँकरची गजर भासली. सध्या 734 ग्रामस्थांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. मागील पंधरा दिवसात पारा वाढला असून प्रचंड उष्मा जाणवत आहे. तापमान 40 अंशावर पोचले आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची गावे वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे टँकर धावू लागले असले तरीही जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा अजुनही मंजूर झालेला नाही. तालुकास्तरावरुन आराखडे उशिरा आल्यामुळे जिल्ह्याचा आराखडा बनविण्यास विलंब झाला. हा आराखडा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून बनविला जातो. तो अंतिम मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवता. नुकताच 11 कोटी 41 लाखाचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे. यामध्ये पाणी योजना दुरुस्तीवर सर्वाधिक खर्च होणार आहे. गतवर्षी हा आराखडा चौदा कोटी रुपयांचा होता.









