Friday, August 21, 2026
spot_img
Home संगमेश्वर वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला

वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला

अर्धा तास घरात बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमी

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रतिभा प्रकाश दळवी (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास कोंबड्यांचा फडशा पाडण्यासाठी बिबट्या घरात शिरला. याचवेळी प्रतिभा दळवी यांचा बिबट्याशी सामना झाला. त्यांनी तब्बल अर्धा तास घरातच बिबट्याचा सामना करत प्रसंगावधान राखले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दळवी यांनी धाडसाने घराचा पुढील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्याने घराबाहेर पडत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या झटापटीत दळवी जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वांझोळे परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. देवरूखचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे तसेच माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांनीही रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. बिबट्याच्या या धाडसी हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.