वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट

पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री मालवली. गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते मुंबई येथे उपचार घेत होते. गवाणकर यांच्या निधनाने मालवणी रंगभूमीचा एक आधारस्तंभ कोसळला असून, कोकणच्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या लेखणीच्या आणि रंगभूमीच्या माध्यमातून मालवणी संस्कृतीला नवे आयाम दिले. मालवणी भाषेचा अस्सल बाज, बोलीचा गोडवा आणि कोकणी माणसाचे स्वभावचित्रण त्यांनी आपल्या साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने तर मालवणी नाट्यजगताला एक नवी आणि वेगळी ओळख मिळवून दिली. या नाटकाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी आणि मालवणी रसिकांना हास्य आणि विचारांची अनोखी मेजवानी दिली.
गंगाराम गवाणकर यांच्या विनोदी लेखनाने आणि खास मालवणी संवादशैलीने असंख्य प्रेक्षकांना खळखळून हसवत, त्याच वेळी समाजातील विसंगतींवर विचार करायला लावले. त्यांच्या साहित्यातून आलेला कोकणी मातीचा सुगंध, संवादांचा गोडवा आणि हास्याचा अखंड झरा यामुळे ते रसिकांच्या मनात कायम घर करून राहिले. त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका लेखकाचे किंवा नाटककाराचे जाणे नसून, मालवणी रंगभूमीतील एका युगाचा अस्त आहे. गवाणकर यांच्या निधनामुळे मालवणी रंगभूमी, त्यांचे जन्मस्थान राजापूर आणि संपूर्ण कोकण आज शोकमग्न झाले आहे. त्यांच्या स्मृती त्यांच्या लेखणीचा सुगंध आणि हास्याच्या स्मृतींच्या रूपात कायम झुळझुळत राहतील.