लोटे स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

‘डॉक्टर खान’ कंपनीतील स्फोटात ११ कामगार झाले होते जखमी

खेड:- परशुराम लोटे एम.आय.डी.सी. येथील ‘डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत शुक्रवारी दुपारी इथाइल सिलिकेट केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ११ कामगार गंभीर भाजले असून त्यांना विविध दुखापती झाल्या आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी न घेतल्याप्रकरणी खेड पोलिसांनी कंपनीचे मालक, मॅनेजर आणि प्लांट इन्चार्ज यांच्यासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी, ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कंपनीतील इथाइल सिलिकेट तयार होणाऱ्या प्लांटमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, प्लांटच्या छताचे सिमेंटचे पत्रे उडून कामगारांच्या अंगावर पडले. त्याचवेळी रिअॅक्टरमधील अत्यंत उष्ण आणि घातक केमिकल अंगावर उडाल्याने व आगीच्या ज्वाळांमुळे तिथे काम करणारे कामगार गंभीररीत्या भाजले.

फिर्यादी शिवानंद बाबूराव खोंडे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना हेल्मेट, गमबूट, सेफ्टी ड्रेस, गॉगल किंवा हॅन्ड ग्लोज यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात डॉ. विखार ऐहमद खान (मालक), सलीम अब्दुल वासे बिजापुरे (कंपनी मॅनेजर), प्रितम बाळकृष्ण पोलेकर (प्लांट इन्चार्ज) आणि व्यवस्थापनातील इतर अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८६, २८७, २८८ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या स्फोटात नंदकिशोर सुभाष राणे (४५, दाभिळ), सुजन गोपाळ दास (२९, आवाशी – सुपरवायझर), असद इमाम उद्दीन खान (४४, लोटे),अरमान जुनेद शहा (२९, बिहार), रणजित सुभाष राणे (४०, दाभिळ), रघुनाथ खंडू खामकर (५७, मुंडे), समीर इनायत्तुल्ला शेख (२२, लातूर), महमद ईस्तीयाक शेख (२७, बिहार), परवेझ सादीक शेख (२२, लातूर), बिपीन रवींद्र मोरे (३४, चिपळूण), शिवानंद बाबूराव खोंडे (फिर्यादी) हे कामगार जखमी झाले आहेत.

या घटनेने लोटे औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली असून, औद्योगिक सुरक्षा विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.