रत्नागिरी:- पाणी टंचाई जाणवू नये यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे ग्रामीण भागात बांधले जात असून हातखंबा येथे सार्वजनिक विहीरीजवळ महिला बचत गटांमार्फत दोन बंधारे बांधण्यात आले.
कोकणात कितीही पाऊस पडला तरी पाणी वाहून जात असल्याने फेब्रुवारीनंतर अनेक भागात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात छोट्या नद्या, नाले, वहाळांवर वनराई बंधारे बांधण्याच्या मोहीमा सातत्याने राबवल्या जात आहेत. दरवर्षी जिल्ह्यात आठ ते दहा हजार वनराई बंधारे बांधले जात आहेत. यामुळे पाणी टंचाईच्या झळा बर्यापैकी कमी झाल्या असून, विहीरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावातही दरवर्षी दहा ते बारा बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येतात. यावर्षी ग्रामविकास अधिकारी दीपक पाल्ये यांनी नोव्हेंबरपासूनच बांधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. हातखंबा सनगरेवाडी येथे असणार्या सार्वजनिक विहीरीजवळून वाहणार्या ओढ्यावर महिला बचत गटांना सोबत घेऊन दोन बंधारे बांधले आहेत. यावेळी सरपंच जितेंद्र तारवे, पोलीस पाटील शर्वरी सनगरे उपस्थित होत्या. दोन बंधारे बांधण्यासाठी तब्बल तीन बचत गटांच्या साठ महिला उपस्थित होत्या. या बंधार्यांमुळे सार्वजनिक विहीरीच्या पाण्याची पातळी वाढेल असे या महिलांनी सांगितले.
वनराई बंधारे बांधण्याच्या कामात संकल्प महिला बचत गटाच्या अध्यक्ष साक्षी सनगरे, तेज महिला बचत गटाच्या अध्यक्षा कस्तुरी सनगरे आणि साई महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा सनगरे यांनी विशेष पुढाकार घेत आपल्या 60 सहकार्यांसह हे बंधारे उभारले. यावेळी सीआरपी पायल कदम, उपजिविका मेघा मेस्त्री, बँकसखी वैदेही मेस्त्री याही उपस्थित होत्या. बंधारे बांधून झाल्यानंतर या सर्व महिलांना सनगरेवाडीच्या स्वच्छतेची आगळीवेगळी मोहीम राबवली.