रत्नागिरी:- लोकअदालतीत जिल्ह्यातून २ हजार ८९० प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि वादपूर्व १४ हजार २०२ प्रकरणे दाखल झाली. ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडा होऊन वाद संपुष्टात आले असून ५ कोटी १२ लाख ८४ हजार ९५९ रुपये रकमेची वसुलीही झाली. यातील वाद सांमजस्याने निर्णीत झाल्यामुळे सुसंवाद निर्माण झाला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय, यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यावर परिणात होतो. काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुध्द पक्षकाराला त्रास देण्यासाठीही होतो. प्रलंबित वादामुळे न्याययंत्रणेवरही ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. यामधून आर्थिक किंवा वेळेचा अपव्यय, मानसिक ताण-तणावामुळे होणारी हानी भरुन काढता येत नाही. हे लक्षात घेऊन लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ७ मे रोजी रत्नागिरीत राष्ट्रीय लोकअदालत झाली. याचे उद्घाटन अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग १ एल. डी. बिले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत उपस्थित होते. न्यायालयात २ हजार ८९० प्रलंबित प्रकरणे होती. त्यापैकी २७२ प्रकरणात निवाडा झाला. एक कोटी पंचान्नव लाख पंचवीस हजार सहाशे सत्तावीस रूपये रकमेचे निवारण झाले. वादपूर्व १४ हजार २०२ पैकी ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडे झाले. वादपूर्वमध्ये बॅकांच्या कर्जवसूली प्रकरणात दोन कोटी छपन्न लाख सत्तावन्न हजार त्रेचाळीस रूपये एवढी कर्ज प्रकरणे वसूली झाली. विदयुत वितरण, ग्रामपंचायत आणि इतर प्रकरणातून ३८,९०,६८८ रुपयांचे वाद सामोपचाराने मिटले. वाहतूक चलन केसेसमध्ये २२,११,६०० रुपये वसूल झाले. एकुण ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडा होऊन वाद संपुष्टात आले असून ५ कोटी १२ लाख ८४ हजार ९५९ रुपयांची वसुली झाली.
मोठया संख्येने प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणकडे दाखल झाल्यामुळे लोकन्यायालयापूर्वी सतत चार दिवस पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वबैठकांच्या दरम्यान विशेष प्रशिक्षण दिलेले कीर विधी महाविदयालयाचे विदयार्थी यांनी समुपदेशन उपक्रमात लोकांना सहकार्य केले. त्यामुळे सामंजस्याने वाद निवारण शक्य झाले.