लॉकडाऊनच्या निर्णयानंतर गणपतीपुळेत पुन्हा शुकशुकाट 

रत्नागिरी:- टाळेबंदीचे निर्बंध जाहीर केल्यानंतर गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचाही राबता थांबला आहे. नेहमी गर्दी असलेल्या गणपतीपुळे किनार्‍यावर शुकशुकाट होता. काही नारळ विक्रेत्यांचे स्टॉल सुरु होते; परंतु एकही पर्यटक दिसत नव्हता.

वर्षभरापुर्वी कोरोनाने राज्यात प्रवेश केल्यानंतर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले होते. सर्वच व्यवहार पूर्णतः ठप्प होते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शिथिलता आली आणि व्यावसाय सुरु झाले. पुन्हा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि कडक टाळेबंदीला सुरुवात झाली. गेले आठ दिवस शासनाच्या निर्णयाकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. पर्यटकांचा राबता गेल्या काही दिवसात कमी झाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यामुळे पर्यटकांनी आरक्षणे रद्द केली आहेत. शासनाच्या आदेशानुसार गणपतीपुळे देवस्थाननेही दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर बंद असल्याने पर्यटक येणे अशक्य आहे. मंगळवारी (ता. 6) दिवसभर किनार्‍यावर पूर्णतः शुकशुकाट होता. काही नारळ विक्रेते स्टॉल उघडे ठेवून होते. किनार्‍यावर उंट सवारी करणार्‍यांचे प्राणी बसून होते. पर्यटकांचा राबता थांबल्यामुळे येथील पर्यटन व्यावसायाला मोठा फटका बसणार आहे.