लाला कॉम्प्लेक्स येथे भरधाव कारने महिलेला चिरडले; अपघातात महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रविवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या ‘हिट अँड रन’ अपघातात प्रसिद्ध ‘सहेली ब्युटी पार्लर’च्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लाला कॉम्प्लेक्स येथील रस्त्यावर हा अपघात झाला. सौ. सुनीता साळवी या रस्त्यावर पडल्या असताना, राजीवडा येथील एका तरुणाने आपली भरधाव होंडा सिटी कार त्यांच्या अंगावरून नेली. या अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेतली आहे. पालकमंत्री सामंत यांनी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

​सौ. सुनीता साळवी या गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसायात होत्या. त्या रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून ओळखल्या जात. शहरात त्यांची दोन पार्लर असून त्यांनी आपल्या कष्टाने हा व्यवसाय नावारूपाला आणला होता.

​अत्यंत नम्र, मितभाषी आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या सुनीता साळवी यांच्या अशा जाण्याने त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. कोणालाही अपशब्द न वापरता सर्वांना प्रेमाने वागवणारे एक उमदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा परिवार आहे.