रत्नागिरी:- चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आणि वातावरणातील रोजचे बदल यामुळे कोकणच्या हापूस आंब्याला मोहोर धारणा उशिरा होत असल्याने या वर्षी हापूसचे दर्शन उशिरा होणार असे दिसत आहे. चांगल्या प्रमाणात थंडी पडल्यास मोहोर प्रक्रिया उत्तम होते. मात्र, दिवाळी झाली तरी थंडीचा पत्ताच नसल्याने हापूसच्या कलमांना मोहोर दिसतच नाही. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे मोहर येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्यक आहे. थंडी जर चांगल्याप्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिरा येतो. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम होतो.
गेल्या काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. ज्यामुळे मोहोर वर्षे, फलधारणा, फळांची वाढ यावर विविध परिणाम दिसून येत आहे. आंब्याचे झाड आणि वातावरण हे दोन्ही आंबा मोहोर येण्याला कारणीभूत आहेत. आंब्याच्या जातीपरत्वे आंब्याला मोहोर येतो. नैसर्गिकपणे विचार केल्यास हापूस आंब्याला एक वर्षाआड मोहोर येतो. हापूस आंब्याला जून काडीमधून मोहोर फुटतो. सुमारे एक वर्ष वयाच्या जून झालेल्या काडीतून हापूसला मोहोर येतो. गतवर्षी देखील अनेक बागायतदारांच्या पदरी निराशा पडली होती. गेली तीन वर्षे वातावरणामुळे शेतकऱ्यांना हापूस आंब्याचे उत्पन्न मनाजोगते मिळत नाही.
कोकणामध्ये हापूस आंबा आणि काजू बी याच्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांचे आणि बागायतदारांचे आर्थिक गणित ठरलेले असते. काजू पिक काही शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत असली तरी हापूसचे पिक शेतकऱ्यांना लाभदायक ठरत नसल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्याच्या कालखंडामध्ये बहुतांश ठिकाणी हापूस आंब्याच्या झाडाला मोहोर येण्याची प्रक्रिया होते. त्याप्रमाणे सर्वत्र असणाऱ्या हापूस झाडांवर मोहोर दिसतात. मात्र, या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गावांमध्ये तुरळक प्रमाणात मोहोर धरणा झालेली पहायला मिळत आहे.
गतवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहोर दिसत होता. त्यामुळे उत्पन चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. मात्र, वातावरणातील परिणामुळे गतवर्षी मोहोर गळून गेला होता. हंगामाच्या शेवटी शेवटी मोठ्या प्रमाणात हापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडला. मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. या वर्षीदेखील उशिरा मोहोर प्रक्रिया झाली तर गतवर्षीप्रमाणे हापूसला दर कमी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना हापूसच्या उशिरा येण्याची चांगलीच चिंता लागून राहिली आहे.









