लांजा:- तालुक्यातील शिरवली येथे दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुषार दत्ताराम कुळये (वय ४१, रा. मु. पो. शिरवली पलीकडचीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४७/२०२६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे) नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तुषार कुळये हे फिर्यादी प्रवीण दत्ताराम कुळये यांचे मोठे भाऊ होते. ६ सप्टेंबर रोजी रात्री ७.१० वाजण्याच्या सुमारास तुषार हे अनंत गोपाळ कुळये (वय ४५, रा. शिरवली पलीकडचीवाडी) याच्या युनिकॉर्न मोटारसायकलच्या मागे बसून जात होते. ते शिरवली ते शिरवली फाटा रस्त्यावरील खानविलकर यांच्या घरासमोर आले असता, अचानक रस्त्यात गुरे आडवी आली. त्यामुळे चालक अनंत कुळये याने मोटारसायकलचा अचानक ब्रेक दाबल्याने दोघेही खाली पडून अपघात झाला.
या अपघातानंतर प्रसन्न देवू राजापकर आणि प्रकाश तुकाराम राजापकर यांनी सांबरे रुग्णवाहिकेद्वारे तुषार कुळये यांना उपचारासाठी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता रत्नागिरी येथील चिराय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय फडके यांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी चालक अनंत गोपाळ कुळये याच्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात आधीच मोटर अपघात रजिस्टर नंबर १२/२०२६ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली असून, ११ सप्टेंबर रोजी या घटनेची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.









