लांजा:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, काजळी, बेनी, नावेरी या प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. तर तालुक्यातील कोलधे कुंभार गाव आणि प्रभानवल्ली गणेशखोरवाडी येथील दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाला बसला असून शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून चार ते पाच दिवसांपासून पावसाने लांजा तालुक्याला झोडपून काढले आहे. संततधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. आज मंगळवारी तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी व नावेही या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी साटवली मुस्लिम वाडी येथील मशिदीपर्यंत पोहोचले होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने पुढील हानी टळली आहे. तसेच गोळवशी- वडदहसोळ त्या ठिकाणी देखील नदीच्या पुराचे पाणी पुलाला चाटून जात होते. काजळी नदीच्या पुराने देखील रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे.